Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:01 IST2025-06-20T15:00:59+5:302025-06-20T15:01:53+5:30
नांदेडच्या व्यापाऱ्याची वसमत येथे बोलावून फसवणूक; दोन पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल

Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) : नांदेड येथील व्यापाऱ्यास गाठून एका युवकाने ‘आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले ते विकण्यासाठी आमची मदत करा,’ असे बोलून त्यांना सोन्याचे चार मणी खात्री करण्यासाठी दिले. त्यानंतर काही दिवसांनी वसमत येथे व्यापाऱ्यास बोलावून बनावट सोन्याचा २० पदरी हार १५ लाख रुपये घेऊन दिला. तो हार बनावट सोन्याचा असल्याचे कळाल्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी दोन पुरुषासह एका महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड येथील व्यापारी संतोष लक्ष्मण बेलापुरे (वय ४७, रा. बेळकोणी (बु) ता. बिलोली. जि नांदेड) यांचे शास्त्रीनगर नांदेड येथे दुकान आहे. २२ एप्रिल रोजी एक युवक त्यांच्याकडे आला होता. ‘आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले आहे ते सोने विकण्यासाठी आम्हाला मदत हवी आहे,’ असे म्हणत त्यांना सोन्याचे चार मणी खात्री करण्यासाठी दिले.ते सोन्याचे चार मणी खरे आसल्याची खात्री झाली त्यामुळे व्यापार्याला सोन्याचा आला, त्यानंतर काही दिवसानंतर तिघांनी बेलापुरे यांना वसमत शहरातील आसेगाव कॉर्नर येथे बोलावले. बनावट २० पदरीहारासाठी त्यांच्यात १५ लाख रुपयात बोलणी झाली. बेलापुरे यांनी १५ लाख रुपये त्या तिघांना देत निघून गेले.
हा सर्व प्रकार २२ एप्रिल ते ९ मे दरम्यान घडला. काही दिवसांनंतर बेलापुरे यांना त्या हाराबद्दल संशय आला आणि त्यांनी तो हार पाण्यात घातला असता तो काळा पडला.तो हार सोन्याचा नसल्याचे कळताच बेलापुरे यांनी नांदेड येथील पोलिसांकडे अनोळखी तिघांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली. घटनास्थळ वसमत येथील असल्याने तो गुन्हा शहर पोलिस ठाण्यात १९ जून रोजी रात्री वर्ग करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, फौजदार बोंडले, इम्रान कादरी, गजानन भोपे हे करीत आहेत.
त्या अनोळखी तिघांचा शोध सुरू....
नांदेड येथील व्यापाऱ्यास एक किलोचे बनावट सोन्याचे २० पदरीहार देणाऱ्या तिघांपैकी एकाचा पोलिसाजवळ मोबाईल नंबर आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत. ते अनोळखी तिघेजण वसमत शहरातील नसून बाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.