Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:23 IST2025-05-03T17:23:07+5:302025-05-03T17:23:49+5:30

अपघातानंतर टिप्परचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे

Hingoli: Tipper breaks divider and overturns directly on auto; two passengers die after being crushed underneath | Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू

Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू

- इस्माईल जहागीरदार
वसमत :
भरधाव टिप्परने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभ्या ऑटोला धडक दिली. त्यानंतर त्याच ऑटोवर टिप्पर उलटल्याने त्याखाली दबून दोघेजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना वसमत शहरातील कवठा रोडवरील मदिना चौकात ३ मे रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास घडली.

परभणीकडून माती घेऊन निघालेला भरधाव टिप्पर (एम.एच.२० सी.टी.९७९७) वसमत शहराजवळील विटभट्टीकडे जात होता. हा टिप्पर कवठा रोडवरील मदिना चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि टिप्पर डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पिण्याच्या पाण्याची बाॅटल घेण्यासाठी थांबलेल्या प्रवासी ऑटो (एम.एच.३८ डब्ल्यू ०१९७) वर आदळला व त्याच ऑटोवर उलटला. टिप्पर आणि मातीखाली ऑटोतील प्रवासी दबल्या गेले. या अपघातात यास्मिन बेगम मोईन खान (२८, रा.मनमाड), शोएब खान जलील खान (१६, रा.कुरूंदा ता.वसमत) हे दोघे जागीच ठार झाले. तर अफ्फान मोईन खान (५), आझाद मोईन खान (७, दोघे रा.मनमाड), संतोष असाराम खनके (४०, रा.श्यामनगर, वसमत) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून नांदेडला हलविण्यात आले. तर अपघातानंतर टिप्परचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

क्रेनच्या मदतीने टिप्पर बाजुला काढला
टिप्पर ऑटोवर उलटल्याने प्रवासी त्याखाली दबले गेले. त्यांना बाहेर काढणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी क्रेनची मदत घेत उलटलेला टिप्पर बाजुला काढण्यात आला. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान आमदार राजू नवघरे यांनी घटनास्थळी भेट देत जमवाला शांत केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, इम्रान कादरी, जोंधळे यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वसमत शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ऑटोतील प्रवासी हे वसमत येथे कार्यक्रमासाठी निघाले जात होते, अशी माहिती आहे. परंतु, कार्यक्रमस्थळी पोहोचण्याअगोदरच काळाने घाला घातला.

घटनास्थळी आक्रोश...
माती वाहतूक करणारा भरधाव हायवा टिप्पर डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला येत ऑटोवर उलटला. मदिना चौक हे गर्दीचे ठिकाण आहे. काही क्षणातच झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी मदतीसाठी पोलिस प्रशासनासह शेकडो नागरिक धावले. या ठिकाणी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. टिप्पर चालक आणि मालकाविरूद्ध कारवाईची मागणी होत होती.

Web Title: Hingoli: Tipper breaks divider and overturns directly on auto; two passengers die after being crushed underneath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.