धारदार हत्यारासह दबा धरून बसलेल्या तीन दरोडेखोरांना अटक; पाचजण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:52 IST2019-07-16T15:50:04+5:302019-07-16T15:52:13+5:30

पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी करताच दरोडेखोरांचे पलायन

In Hingoli, Three robbers arrested with a sharp-edged weapons; Five absconding | धारदार हत्यारासह दबा धरून बसलेल्या तीन दरोडेखोरांना अटक; पाचजण फरार

धारदार हत्यारासह दबा धरून बसलेल्या तीन दरोडेखोरांना अटक; पाचजण फरार

ठळक मुद्दे रमेश मनोहर भोसले, सचिन गुरूलिंग शिंदे, आकाश गजानन वाघमारे हे तिघेजण अटकेतमोरवाडी शिवारात आठ दरोडेखोर हत्यार व वाहनांसह पोलिसांना आढळुन आले.

हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीने आठ दरोडेखोर कळमनुरी-बाळापूर मुख्य रस्त्यावरील मोरवाडी शिवारात १६ जुलै मध्यरात्रीच्या सुमारास धारदार हत्यारासह दबा धरून बसले होते. हा प्रकार पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी चौकशी करताच यातील पाचजण पळुन गेले. तर तिघांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी आठ जणांविरूद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शिवसांब घेवारे हे पथकासोबत पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान कळमनुरी-बाळापुर मुख्य रस्त्यावर मोरवाडी शिवारात आठ दरोडेखोर हत्यार व वाहनांसह पोलिसांना आढळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेताच आरोपींनी धूम ठोकली. परंतु यातील तिघांना पोलिसांना पकडण्यात यश आले. 

याप्रकरणी पोउपनि घेवारे यांनी कळमनुरी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश मनोहर भोसले रा. इंदिरानगर कळमनुरी, सचिन गुरूलिंग शिंदे रा. संतनगर कौठा रोड वसमत, आकाश गजानन वाघमारे रा. होमगार्ड कॉलनी कौठा रोड वसमत, विलास रमेश शिंदे, कैलास रमेश शिंदे, सुरेश गुरूलिंग शिंदे, जनार्धन मनोहर भोसले, प्रदीप सर्जेराव चव्हाण रा. औरंगाबाद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी रमेश मनोहर भोसले, सचिन गुरूलिंग शिंदे, आकाश गजानन वाघमारे हे तिघेजण अटकेत असून बाकी आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनखाली पोउपनि घेवारे, किशोर पोटे व पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. तपास पोउपनि खार्डे करीत आहेत.

Web Title: In Hingoli, Three robbers arrested with a sharp-edged weapons; Five absconding