Hingoli: लाखमोलाच्या जमिनी शक्तिपीठसाठी देणार नाही; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:25 IST2025-07-01T15:24:00+5:302025-07-01T15:25:13+5:30

आंदोलनादरम्यान नांदेड ते नागपूर रोडवर जवळपास दोन तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

Hingoli: Shaktipeeth will not give land worth lakhs for highway; Farmers and villagers block the road | Hingoli: लाखमोलाच्या जमिनी शक्तिपीठसाठी देणार नाही; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा रास्तारोको

Hingoli: लाखमोलाच्या जमिनी शक्तिपीठसाठी देणार नाही; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा रास्तारोको

- गंगाधर सितळे
डोंगरकडा (जि. हिंगोली) :
आमची सोन्यासारखी लाखमोलाची जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी कदापी देणार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी आज, मंगळवारी ( दि. १) सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव जवळ रास्तारोको आंदोलन करत ‘शक्तिपीठ महामार्गाला’  विरोध केला. आंदोलनादरम्यान जवळपास दोन तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

राज्यामध्ये नागपूर ते गोवा जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी देखील विरोध दर्शविला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने भाटेगाव जवळील नांदेड ते नागपूर रोडवर आज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत भाटेगाव व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महालिंगी, दाभडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, गूंडलवाडी, जवळापांचाळ, वसफळ आदी गावांसह इतर अनेक गावांतील ग्रामस्थांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशी घोषणा देत रास्तारोको आंदोलन केले. पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्राखाली संपूर्ण जमीन बागायती असून येथे हळद, केळी, संत्रा आदी पिके पिकविली जातात. या भागातील पिके राज्यासह परदेशातही निर्यात केली जातात. अशावेळी आम्ही आमची लाखमोलाची सोन्यासारखी जमीन ‘शक्तिपीठा महामार्गास’ काय म्हणून द्यावी? असा प्रश्न आंदोलकांनी केला.

आम्ही उदरनिर्वाह कसा करावा?
आमची लाखमोलाची जमीन रस्त्यासाठी देवून आम्ही काय रस्त्यावर यावे का? असा प्रश्नही यावेळी आंदोलकर्त्यांनी उपस्थित केला. शासन आमच्या भागातून शक्तिपीठ महामार्ग करु पाहत आहे. परंतु हा महामार्ग आम्ही कदापीही करु देणार नाही. जमीन दिल्यास लेकराबाळांना काय खावू घालावे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक ग्रामपंचायतींनीही ‘शक्तिपीठ’ ला विरोध दर्शविला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन...
दोन ते तीन तास रास्तारोको आंदोलन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले. निवेदनावर ग्यानोबा हाके, अनिल चव्हाण, आर. एस. राठोड, गोपाळ राठोड, गजानन गावंडे, पंडितराव देशमुख, पराग अडकिने, बाळासाहेब गावंडे, शरद अडकिने, सोपान क्षीरसागर, प्रदिप गावंडे, अशुतोष हाके, शाम वीर, बालाजी देवतरासे, मनोज चव्हाण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनादरम्यान पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, शिवसांभ घेवारे, कृष्णकांत गुट्टे, गणेश गोटके, नागोराव बाभळे, संतोष नागरगोजे, रामदास ग्यादलवाड, अतूल मस्के, शिवाजी पवार आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Hingoli: Shaktipeeth will not give land worth lakhs for highway; Farmers and villagers block the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.