हिंगोलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 15:27 IST2019-04-23T15:23:27+5:302019-04-23T15:27:35+5:30
आमदार डॉ. संतोष टारफे यांना केली होती जातीवाचक शिवीगाळ

हिंगोलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना अटक
हिंगोली : येथील शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांना पोलिसांनी २३ एप्रिल २०१९ रोजी हिंगोली शहरातील कयाधू नदी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
कळमनुरी मतदार संघाचे आ. डॉ. संतोष टारफे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात संतोष बांगर यांच्याविरूद्ध ४ डिसेंबर २०१८ रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात हिंगोली शहरातून बांगर यांना डीवायएसपी अे. जी. खॉन यांनी अटक करून औंढा ठाण्यात हजर केले. त्यानंतर औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात बांगर यांचे मेडिकल करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, २९ नोव्हेंंबर २०१८ रोजी औंढा नागनाथ येथे तालुका दुष्काळग्रस्त करावा या मागणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी दोन ते अडीच हजार उपस्थित जनतेसमोर आ. डॉ. संतोष टारफे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व शब्दांचा वापर करीत त्यांचा अवमान केला. याप्रकरणी आ. टारफे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्याविरूद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात २३ एप्रिल रोजी हिंगोली शहरातून बांगर यांना अटक केल्याची माहिती हिंगोली ग्रामीणचे डीवायएसपी अे. जी. खाँन यांनी दिली. हिंगोली येथील न्यायालयात आरोपी संतोष बांगर यास हजर केले जाणार असल्याचे डीवायएसपी खाँन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.