हिंगोली नगरपालिकेची सरस कामगिरी; सौंदर्यीकरण व स्वच्छतास्पर्धेत राज्यात तिसरी
By विजय पाटील | Updated: April 20, 2023 17:41 IST2023-04-20T17:41:23+5:302023-04-20T17:41:39+5:30
जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली.

हिंगोली नगरपालिकेची सरस कामगिरी; सौंदर्यीकरण व स्वच्छतास्पर्धेत राज्यात तिसरी
हिंगोली : महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत अ व ब न.प. गटात हिंगोली नगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने हिंगोली पालिकेची कामगिरी सरस ठरत असून या पुरस्काराच्या रुपाने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.
जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा ही सहा गटामध्ये विभाजित केली होती. यामध्ये अ आणि ब वर्ग नगर परिषद मिळून एक गट केला होता. त्यामध्ये हिंगोलीने बाजी मारली. महाराष्ट्र राज्यामधून तृतीय क्रमांक पटकावला असून सन्मान पत्र व पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रधान सचिव नगर विकास विभाग सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक, किरण कुलकर्णी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रशासकीय कामगिरीत राज्यात द्वितीय
नगर विकास विभाग दिनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या विविध कमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अ आणि ब वर्ग नगर परिषद गटामध्ये हिंगोली पालिकेने द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्याधिकारी अरविंद मुंढे, शहर अभियंता . रत्नाकर अडसिरे, स्वच्छता निरिक्षक बाळू बांगर, शहर समन्वयक आशिष रणसिंगे, शहर अभियान व्यवस्थापक पंडित मस्के आणि प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
कामगिरीत सातत्य
स्वच्छता अभियानात हिंगोली नगरपालिकेने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात रामदास पाटील, अजय कुरवाडे यांनी निर्माण केलेल्या परंपरेत मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी भर घालत कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यामुळे हा आणखी एक पुरस्कार मिळाला. शहरातील नागरिकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम या बळावर पालिकेला हे दोन पुरस्कार मिळाल्याचे मुंढे यांनी सांगितले.