हिंगोलीत नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 15:38 IST2018-12-15T15:37:13+5:302018-12-15T15:38:01+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन

हिंगोलीत नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
हिंगोली : राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले जात आहे. १५ डिसेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने हिंगोली येथे कर्मचाऱ्यांनी शनिवारी एकदिवशीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास २४० नगर परिषद व ११० नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व सवंर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. राज्यभरातील नगर परिषद व नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन दिले होते. परंतु शासनस्तरावरून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले जात आहे. २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत काळ्याफिती बांधून काम केले जाईल असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आंदोलनात राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, शाम माळवटकर, बाळु बांगर, विजय शिखरे, शिवाजी घुगे, विजय इंगोले, द्रौपदाबाई हातागळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत.