सात दिवसांच्या बंदनंतर हिंगोलीचा मोंढा सुरू; सोयाबीनच्या दरात २०० रुपयाने वाढ
By रमेश वाबळे | Updated: November 16, 2023 18:35 IST2023-11-16T18:33:28+5:302023-11-16T18:35:57+5:30
सोयाबीनचे भाव ४ हजार ८०० ते ५ हजार २२१ पर्यंत भाव

सात दिवसांच्या बंदनंतर हिंगोलीचा मोंढा सुरू; सोयाबीनच्या दरात २०० रुपयाने वाढ
हिंगोली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील मोंढा व हळद मार्केटयार्ड सात दिवसांपासून बंद होते. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. या दिवशी सोयाबीनचा भाव दोनशे रुपयांनी वधारला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर हळद दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरली.
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. त्यातच बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दीपावलीअगोदर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठत नसल्याने शेतकऱ्यांत निराशा होती; परंतु दिवाळीतील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागली.
गुरुवारी मात्र सोयाबीनचा भाव जवळपास दोनशे रुपयांनी वधारला. किमान ४ हजार ८०० ते कमाल ५ हजार २२१ रुपये भाव मिळाला. सध्या मिळणारा भाव लागवडीच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान ६ हजार रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
हरभऱ्याच्या दरात तीनशेंनी वाढ...
रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, पेरणी होऊन शिल्लक राहिलेला हरभरा शेतकरी मोंढ्यात विक्रीसाठी आणत आहेत. गुरुवारी हरभऱ्याचे दर तीनशे रुपयांनी वधारले. या दिवशी १५ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार २०० ते ६ हजार रुपये भाव मिळाला.
हळद आणखी घसरली...
येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीला सरासरी १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली. ८ नोव्हेंबर रोजी सरासरी ११ हजार ६६२ रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बंद होते. गुरुवारी भाव वधारण्याची शक्यता होती. मात्र, जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयांनी भाव घसरले. सरासरी ११ हजार ४०० रुपये भाव मिळाला. घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.