Hingoli: तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्यांची शिकार, ग्रामस्थ दहशतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:27 IST2025-12-12T17:26:46+5:302025-12-12T17:27:27+5:30
गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने कुत्रे व शेळ्यांवर हल्ले केले असूनही वन विभागाची कोणतीही कारवाई दिसत नाही.

Hingoli: तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्यांची शिकार, ग्रामस्थ दहशतीत
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी शिवारात बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केल्याच्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. पोतरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या चर्चांना वन विभागाने अफवा ठरवले असले तरी ११ डिसेंबरच्या रात्री काशिनाथ नारायण मोदे यांच्या शेतात घडलेल्या घटनेने या चर्चांना उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याच्या हालचाली सातत्याने सुरू असतानाही वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
पोतरा शिवारातील वसंतराव कोंडबाराव मुलगीर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा असलेले वन विभागाचे वाहन माझ्या शेताजवळ दिसले होते, पण तेव्हा बिबट्याची कुणालाच कल्पना नव्हती. आता मात्र वाटतंय की बिबट्या मुद्दाम सोडण्यात आला असावा. गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याने कुत्रे व शेळ्यांवर हल्ले केले असूनही विभागाची कोणतीही कारवाई दिसत नाही. एखादा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ग्रामस्थांच्या या नाराजीवर वनपाल शिवाजी काळे यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत, बिबट्या असल्याची खात्री आहे. मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकरी आणि पशुधनाच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी. विशेषतः रात्री एकटे बाहेर पडू नये, असा सल्ला दिला. दरम्यान, तेलंगवाडी, निमटोक व पोतरा परिसरात सततच्या घटना होत असल्याने भीतीचं सावट गडद होत असून वन विभागाकडून ठोस कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून अधिक तीव्र होत आहे.