HIngoli: बसमध्ये चढताना महिला प्रवाशाचे अडीच लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:57 IST2025-05-03T13:23:11+5:302025-05-03T13:57:20+5:30
बसस्थानक बनले गैरसोयीचे, चोरीच्या घटना वाढू लागल्या

HIngoli: बसमध्ये चढताना महिला प्रवाशाचे अडीच लाखांचे दागिने लंपास
वसमत (जि. हिंगोली) : बसमध्ये बसत असताना एका महिला प्रवाशाच्या बॅगमधील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना वसमत बसस्थानकात २ मे रोजी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
परभणी शहरातील सहकार नगरातील सुमित्रा संदीप पिंपरकर या बहिणीच्या लग्नासाठी अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी सेलू (ता. वसमत) येथे जाण्यासाठी वसमत बसस्थानकात उतरल्या होत्या, येथून त्या मुलाला घेऊन औंढाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसत होत्या, यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सुमित्रा यांच्या गळ्यातील पर्स कापून त्यातील ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ११ ग्रॅम वजनाचा नेकलेस, ८ ग्रॅम वजनाचे झुंबर असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बसस्थानक परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरटे गर्दीचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी सुमित्रा पिंपरकर यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. महाजन तपास करीत आहेत.
लाॅकरमधून काढले होते दागिने
बहिणीचे १० मे रोजी लग्न असल्याने सुमित्रा पिंपरकर यांनी बँक लाॅकरमध्ये सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने काढले होते. त्यानंतर त्या माहेरी सेलू गावाकडे निघाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी दागिने लंपास केले.
बसस्थानक बनले गैरसोयीचे
वसमतच्या नवीन बसस्थानकाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरता प्रवासी निवारा प्रवाशांसाठी उभारण्यात आला आहे. तात्पुरत्या शेडमध्ये प्रवाशांसाठी कोणतीच सुविधा नाही, त्यामुळे बसस्थानक गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.