Hingoli: पती हरवल्याची तक्रार, दुसऱ्याच दिवशी महामार्गाच्या दुभाजकावर आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:31 IST2025-11-03T19:29:57+5:302025-11-03T19:31:14+5:30
पत्नीने पती हरवल्याची बाळापूर ठाण्यात केली होती तक्रार; मयत इसम नांदेड जिल्ह्यातील मरडगा येथील रहिवासी

Hingoli: पती हरवल्याची तक्रार, दुसऱ्याच दिवशी महामार्गाच्या दुभाजकावर आढळला मृतदेह
आखाडा बाळापूर ( हिंगोली) : मोबाइल दुरुस्तीसाठी कामठा फाटा येथे आलेला इसम बेपत्ता झाला. पत्नीने बाळापूर ठाण्यात पती हरवल्याची खबर दिली. त्या हरवलेल्या इसमाचा मृतदेह कामठा फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये आढळला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस अधिक तपास करत असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मरडगा येथील रहिवासी असलेली आम्रपाली राष्ट्रपाल खिल्लारे (वय ३६) हिने बाळापूर पोलिस ठाण्यात तिचा पती राष्ट्रपाल खिल्लारे (४०) हा हरवला असल्याची तक्रार बाळापूर पोलिस ठाण्यात दिली होती. ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रपाल खिल्लारे हा मोबाइल दुरुस्त करण्यासाठी गावाकडून कामठा फाटा येथे आला होता. तेथे नातेवाइकांची भेट झाली, त्यांनी सोबत चहापाणी केल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर मात्र तो बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे अखेर बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये पत्नीने आपला पती राष्ट्रपाल खिल्लारे हरवला असल्याची तक्रार दाखल केली.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कामठा फाटा पुलासमोर डिव्हायडरमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी बाळापूरचे पोलिस दाखल झाले. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, बीट जमादार राजीव घोंगडे, चालक जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर महामार्ग पोलिस जमादार अशोक खोंडकर, शेख वसीम, सोपान थिटे, गजानन देशमुख घटनास्थळी पोहोचले.
मयताची ओळख पटवण्यात आली. सदर मयत हा राष्ट्रपाल खिल्लारे असल्याचे कळल्यानंतर त्याच्या नातेवाइकांना खबर देण्यात आली. मृतदेह बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर मयत हा दारू पिण्याच्या व्यसनाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट दिली असून, पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.