Hingoli: शेतकऱ्यांना दिलासा द्या, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरणावर उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:42 IST2025-10-15T19:42:04+5:302025-10-15T19:42:30+5:30
हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

Hingoli: शेतकऱ्यांना दिलासा द्या, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरणावर उपोषण
हिंगोली : अतिवृष्टीच्या माऱ्यात जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, या संकटातून दिलासा मिळावा यासाठी हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, या मागणीसाठी १५ ऑक्टोबरपासून शेतकरी नेते डाॅ.रमेश शिंदे यांनी तालुक्यातील केसापूर येथील स्मशानभूमीत स्वत: सरण रचून त्यावर उपोषण सुर केले आहे.
हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. खरडलेल्या जमिनी पेरणीलायक राहिल्या नाहीत. अनेक भागात पाणी साचल्याने पिके जागेवरच सडली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाचा बोजाही वाढत आहे. त्यामुळे हिंगोलीसह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. परंतु, सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डाॅ. शिंदे यांनी केला आहे.
शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा असताना हेक्टरी केवळ ८ हजार ५०० रुपयांवर बोळवण करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसून, जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी डाॅ.शिंदे यांनी केसापूर येथील स्मशानभूमीत सरण रचून त्यावर उपोषण सुरू केले आहे.
‘तो’ शासन निर्णय फसवा; उपोषणार्थीचा आरोप...
शासनाच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून हिंगोली आणि सेनगाव तालुक्याला वगळले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी वगळण्यात आलेल्या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. आणि त्यासंदर्भातील शासन निर्णयही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परंतु, त्या शासन निर्णयावर सहसचिवांची स्वाक्षरी नसल्याचा डाॅ. रमेश शिंदे यांनी आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा तोच शासन निर्णय स्वाक्षरीसह सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. परंतु, हा शासन निर्णयही फसवा असल्याचा आरोप उपोषणार्थी डाॅ.रमेश शिंदे यांनी केला असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता स्मशानात सरण रचून उपोषण सुरू केले आहे.