Hingoli District Hospital found in defiance of uncleanness | हिंगोली जिल्हा रूग्णालय सापडले अस्वच्छतेच्या विळख्यात; पिचकाऱ्यांनी रंगल्या भिंती 
हिंगोली जिल्हा रूग्णालय सापडले अस्वच्छतेच्या विळख्यात; पिचकाऱ्यांनी रंगल्या भिंती 

ठळक मुद्देरूग्णालयात येणाऱ्यांना नाकाला रूमाल लावून येण्याची वेळ रूग्णालयाच्या वरच्या मजल्यावरही अस्वच्छता असते

हिंगोली : जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस अस्वच्छतेच्या विळख्यात सापडत चालले आहे. त्यामुळे येथे उचारासाठी येणारे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नातेवाईकांनाही अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली आहे. 

हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची मोठी गर्दी असते. परंतु मागील काही दिवसांपासून येथील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. रूग्णालयाची टोलेजंग इमारत असूनही या ठिकाणी स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात नाही. परिणामी, रूग्णालयात येणाऱ्यांना नाकाला रूमाल लावून येण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे रूग्णालयाच्या वरच्या मजल्यावरही अस्वच्छता असते, शिवाय गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती व खिडक्या रंगल्या आहेत. धूम्रपान निषेध व कार्यवाहीचे जागो-जागी मोठ-मोठे फलक बसविलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नाही, की स्वच्छतेची दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच जिल्हा रूग्णालयातील अस्वच्छतेबाबत आ. तान्हाजी मुटकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर काही दिवस रूग्णालयातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. आता परत ‘जैसे थे’ स्थिती आहे. अनेक वार्डात कचरापेट्या नसतात. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावरच कचरा फेकला जातो. 

प्रत्येकाने रूग्णालयाला ‘आपले’ घर समजावे....
जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय रूग्णालय हे आपले घर समजावे म्हणजे आपसूकच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता जमा होणार नाही. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून सफाई कामगार नसल्यामुळे अस्वच्छतेची समस्या होती. परंतु आता सफाई कामगारांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रूग्णालय चका-चक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये. - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास

Web Title: Hingoli District Hospital found in defiance of uncleanness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.