हिंगोलीत मंडप डेकोरेटर्स आणि कामगारांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 15:22 IST2020-11-02T15:21:59+5:302020-11-02T15:22:48+5:30
५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी

हिंगोलीत मंडप डेकोरेटर्स आणि कामगारांचे धरणे
हिंगोली : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही ५०० लाेकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी दिली नसल्याने हिंगोली जिल्हा टेन्ट अॅण्ड डेकोरेटर असोसिएशन तथा विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात ५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. सध्या तशी परवानगी नसल्याने मंडप, डेकोरेटर्स, आचारी, फुल-हार विक्रेते, फेटेवाले, वाढपी, ऑर्केस्ट्राॅ, छायाचित्रकार, बॅण्डपथक, डीजेवाले, वाढपी, स्वागत पथके, लॉन्सवाले, मंगल कार्यालये अशा विविध घटकांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास या सर्व घटकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यात संबंधितांनी जिल्हा कचेरीसमोर बॅण्ड, डी.जे, विवाह सोहळ्यासाठी लागणारे साहित्यही आणून ठेवले असल्याचे पहायला मिळाले. तर या व्यवसायात काम करणारे शेकडो कामगारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी शासनाने ५०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा घेण्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती. या घोषणांनी जिल्हा कचेरीचा परिसर दणाणून गेला होता. काळे टीशर्ट घालून आंदोलक सहभागी झाले होते. तर विविध प्रकारचे फलकही लावण्यात आले होते.