Hingoli: सुरक्षा रक्षकावर विटांचा वर्षाव करून ज्वेलर्स शॉपीत धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:50 IST2025-07-08T16:45:55+5:302025-07-08T16:50:14+5:30
चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सुरक्षा रक्षकावर विटा फेकून हल्ला केला

Hingoli: सुरक्षा रक्षकावर विटांचा वर्षाव करून ज्वेलर्स शॉपीत धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास
सेनगाव : येथील नगरपंचायत कॉम्प्लेक्समधील गाडे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर चोरट्यांनी मध्यरात्री शटर वाकवून प्रवेश करत सुमारे ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही धाडसी चोरी ८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सुरक्षा रक्षक दाजीबा सुर्यतळ यांच्यावर विटा फेकून हल्ला केला, त्यामुळे ते जखमी झाले आहेत.
दुकानमालक मधूकर गंगाराम गाडे हे ७ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून गावाकडे गेले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आणि शटर वाकवून दुकानात प्रवेश मिळवला. त्यांनी नथ, मोरण्याचे जोड, चांदीच्या अंगठ्या, ब्रासलेट, चांदीचे चेन आदी दागिने चोरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी जीवन मस्के, उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण व इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी घोरदरी दरोड्याचा तपास नाही
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी भुसारे, आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनीही सकाळी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी घोरदरी येथे घडलेल्या दरोड्याचा तपास न लागता, पुन्हा एक चोरी झाल्याने सेनगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.