कमिशनचे आमिष देत बँक खात्यात सायबर फ्रॉडचा पैसा, आंतरराज्य टोळीचे तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:20 IST2025-10-27T12:18:40+5:302025-10-27T12:20:24+5:30
हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई; ताब्यातील सराईत गुन्हेगारांवर तेलंगणा, हरियाणा राज्यात अनेक सायबर गुन्हे दाखल

कमिशनचे आमिष देत बँक खात्यात सायबर फ्रॉडचा पैसा, आंतरराज्य टोळीचे तिघे अटकेत
वसमत (हिंगोली): कमिशनचे आमिष दाखवून नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन गैरव्यवहार करणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आणि पोलिसांनी रविवारी रात्री वसमत शहरातून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १३ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांवर तेलंगणा आणि हरियाणा राज्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलीस पथकाने २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वसमत शहरातील बसस्थानक परिसरात छापा टाकला. यावेळी एका कारमधून मनोज ओमप्रकाश शर्मा (वय २४, रा. हमिरगड, जि. भिलवाडा, राजस्थान), प्रल्हाद शंभुलाल स्वालका (वय २४, रा. चंदेरिया, जि. चितोडगड, राजस्थान), आणि मनोज शिवहार स्वामी (वय ३०, रा. शिरडशाहापूर, ता. औंढा नागनाथ) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड आणि कार असा एकूण १३ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वसमत शहर आणि हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना कमिशनचे आमिष देऊन त्यांचे बँक खाते ऑनलाइन गैरव्यवहारासाठी वापरत असत. अटकेतील आरोपींपैकी दोघांवर तेलंगणा आणि हरियाणा राज्यात ऑनलाईन गैरव्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वसमत तालुक्यात फसवणुकीच्या तक्रारी
ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात सायबर शाखेकडे २० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत हिंगोली पोलिसांनी ऑनलाईन गैरव्यवहार करणाऱ्या टोळीची शोध मोहीम हाती घेतली होती. ज्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.