Hingoli: ग्राहक बनून आले अन् आडत दुकानातून १ लाख ७० हजारांची रोकड पळवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:08 IST2025-10-28T12:07:10+5:302025-10-28T12:08:41+5:30
संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Hingoli: ग्राहक बनून आले अन् आडत दुकानातून १ लाख ७० हजारांची रोकड पळवली!
वसमत : वसमत शहरातील दादरा परिसरात सोमवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ५:३५ वाजता एका आडत दुकानातून १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ग्राहक असल्याचा बहाणा करून आलेल्या दोन इसमांनी ही चोरी केली असून, संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दादरा परिसरातील अशोक काळे आणि बालाजी पाटील यांच्या मालकीच्या आडत दुकानावर सायंकाळी ५:३५ च्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. त्यांनी आपण ग्राहक असल्याचे भासवून दुकान मालकांना बोलण्यात गुंतवले आणि याच संधीचा फायदा घेऊन दुकानाच्या गल्ल्यातून सुमारे १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकान मालकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.