आभाळ फाटले ! पुरामुळे भरपावसात रस्त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 07:04 PM2021-07-24T19:04:44+5:302021-07-24T19:06:36+5:30

अंत्यसंस्कारासाठी नदी पलिकडे जावे लागते. त्यात नदीला पूर आलेला.

In Hingoli, Burial had to be done on the streets due to flood waters | आभाळ फाटले ! पुरामुळे भरपावसात रस्त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार

आभाळ फाटले ! पुरामुळे भरपावसात रस्त्यावर करावे लागले अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देएका बाजूला गाव तर दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी आहे. नद्या ओलांडून अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.

कौठा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील बोरगाव परिसरातील आसना व कुरुंदा नदीला पुराने २३ जुलै रोजी एकाचे अंत्यसंस्कार रोखले होते. नदीच्या पलिकडे स्मशानभूमी असल्याने व अंत्यसंस्कारासाठी दुसरी जागा नसल्याने अंत्यसंस्कारावरून गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र महसूल प्रशासन व पोलिसांनी यावर वेळीच तोडगा काढल्याने पुढील वाद मिटला.

वसमत तालुक्यातील बोरगाव परिसरातून आसना व कुरुंदा नद्या वाहतात. एका बाजूला गाव तर दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी आहे. नद्या ओलांडून अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. २३ जुलै रोजी वाघमारे कुटूंबातील केशव वाघमारे यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी नदी पलिकडे जावे लागते. त्यात नदीला पूर आलेला. शिवाय पलिकडे जाण्यासाठी दुसरा रस्ताच नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला. अंत्यसंस्काराची तयारी करूनही जागाच नसल्याने अंत्यसंस्कार थांबले होते. 

अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. तसेच दुसरी जागा मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमीका वाघमारे कुटुंबियांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती समजताच मंडळ अधिकारी कवठेकर, तलाठी डाके व वसमत ग्रामीण पोलिसांनीही गावात धाव घेतली. सर्वांच्या संमतीने अखेर बोरगाव - किन्होळा रोडवरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: In Hingoli, Burial had to be done on the streets due to flood waters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app