Hingoli: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईसह चिमुकल्याचा मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:05 IST2025-11-08T13:04:16+5:302025-11-08T13:05:51+5:30
कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारातील घटना

Hingoli: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आईसह चिमुकल्याचा मृतदेह आढळला
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील खरवड शिवारात ६ नोव्हेंबर रोजी आईसह पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ज्योती सागर सावळे (२९) व मुलगा राजवीर सागर सावळे (५) अशी मयतांची नावे आहेत.
खरवड येथील ज्योती सावळे आपला मुलगा राजवीर यास शौचास घेऊन जाते, म्हणून दोन ते तीन दिवसांपूर्वी घराबाहेर गेल्या होत्या. त्यानंतर बराचवेळ दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, शोध लागला नाही. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रामराव बदर (रा. खरवड) यांच्या खरवड ते डिग्गी दरम्यान असलेल्या शेताजवळील तलावात ज्योती व राजवीरचा मृतदेह आढळून आला.
ही माहिती कळमनुरी ठाण्यात कळताच पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, फौजदार इंगळे, जमादार देवीदास सूर्यवंशी, रामा शेळके, गुलाब जाधव, शिवाजी देमगुंडे, विलास बांगर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून विच्छेदनासाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, माय-लेकाच्या मृत्यूने खरवड गावावर शोककळा पसरली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.