हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:40 IST2025-08-29T13:39:24+5:302025-08-29T13:40:29+5:30

हिंगोलीत मुसळधार पाऊस:पाण्याची आवक वाढल्याने सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Heavy rains in Hingoli! Siddheshwar-Isapur dam gates opened, traffic disrupted, holiday declared for schools! | हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी!

हिंगोलीत पावसाचा हाहाकार! धरणांचे दरवाजे उघडले, शेतजमिनी-घरे पाण्याखाली, शाळांना सुटी!

हिंगोली : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांना पूर आला आहे. अनेक भागांमधील शेतजमीन पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तर शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर पाण्याची आवक वाढल्याने सिद्धेश्वर धरणाचे १४, तर इसापूर धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ११,९४६ क्युसेक्स पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे. दुसरीकडे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत असलेल्या इसापूर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे ७ दरवाजे ०.५० मीटरने उचलून ११,६३८ क्युसेक्स पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे पूर्णा आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.

वसमत आणि कळमनुरीमध्ये पावसाचा जोर अधिक
वसमत आणि कळमनुरी या दोन तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा आणि वारंगा या तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी  झाली आहे. या तालुक्यात २४ तासांत ४८.१ मिलिमीटर पाऊस झाला. वसमत तालुक्यामध्ये २३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर
जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वसमत आणि औंढा तालुक्यांमधील शाळांना शुक्रवारची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच, हिंगोलीसह इतर तालुक्यातही स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

पुरामुळे वाहतूक ठप्प
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा ते जवळा पांचाळ रस्त्यावरील उमा नदीला पूर आला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारच्या दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती.

घरांमध्ये शिरले पाणी
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, गावातील ७ ते ८ घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. काही जणांचे साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे.

Web Title: Heavy rains in Hingoli! Siddheshwar-Isapur dam gates opened, traffic disrupted, holiday declared for schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.