अवकाळी पावसासह हिंगोली जिल्ह्यात गारांचा पाऊस; हळद भिजली, केळींच्या बागांचे नुकसान
By विजय पाटील | Updated: April 25, 2023 17:54 IST2023-04-25T17:54:13+5:302023-04-25T17:54:24+5:30
हजारो केळीची झाडे तुटून पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी पावसासह हिंगोली जिल्ह्यात गारांचा पाऊस; हळद भिजली, केळींच्या बागांचे नुकसान
हिंगोली: जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान गारांसह अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे हळद, केळी व इतर उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. वादळवारे सुटल्यामुळे अनेक ठिकाणी जुने झाडे उन्मळून पडली होती.
‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने २५ ते २७ एप्रिलदरम्यान गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविला होता. २५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा,वारंगा, जवळापांचाळ, वसमतसह तालुक्यातील कुरुंदा, कौठा, गिरगाव तर औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे दुपारी अडीच वाजेदरम्यान अवकाळी पाऊस झाला.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, डिग्रस (बुद्रक), सालापूर, सुकळी, गुंडलवाडी, दांडेगाव, रेडगाव, वडगाव, जवळा आदी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे या भागातील केळीची झाडे भूईसपाट झाली. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यासमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे केळीची पानेही फाटून गेली. त्यामुळे या झाडांना येणाऱ्या केळीचा दर्जा कमी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वाऱ्यामुळे हजारो केळीची झाडे तुटून पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुपारी शेतकऱ्यांनी हळद वाळायला ठेवली होती. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावताच हळद भीजून गेली आहे. पावसासोबत वादळवारे जोराचे होते. कौठा येथे जुने पिंपळाचे झाडे मुळासकट उन्मळून पडले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दहा मिनिटे गारांचा पाऊस झाला. डोंगरकडा, जवळापांचाळ, गिरगाव आदी ठिकाणी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी दुपारी दीड वाजेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.