तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 16:44 IST2020-12-25T16:37:26+5:302020-12-25T16:44:14+5:30
आरोपींच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल जप्त

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त
हिंगोली : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चाेरणारी टाेळी पाेलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून विविध जिल्ह्यात चाेरी केलेल्या २३ माेटारसायकल अंदाजे १५ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चाेरट्यांना अटक करण्यात आली आहे.
वसमत पोलीस ठाणे येथे २३ डिसेंबर रोजी मोटारसायकल चोरी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि एस. एस. घेवारे,पोउपनि के. डी. पोटे यांच्या पथकाने वसमत पाेलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरी करणारे आरोपी शेख मुर्तझा शेख मन्नान (२१, रा. शुक्रवार पेठ, वसमत), उमेरखा उर्फ हाजी बिस्मीलाखान (२१, रा. कोहिनूर कॉलनी, वसमत), शेख अझर शेख दिल्लू (२६, रा. जितवान नगर, आखाडा बाळापूर) व त्यांचे इतर दोन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्यांनी चाेरी केलेल्या मोटारसायकल वसमत व आखाडा बाळापूर येेथे विक्री केलेल्या असल्याबाबत खात्री झाल्यावरुन या आरोपींच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरी केलेल्या व त्यांचे घरासमोर लावण्यात आलेल्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या.
आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी वसमत शहर व बाळापूर येथे मोटारसायकलचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या मोटरसायकलही जप्त केल्या. सदरच्या मोटारसायकलबाबत त्यांना अधिक विचारपूस करता त्यांनी कुरूंदा, जवळा बाजार, बाळापूर, भोकर, औरंगाबाद येथून मोटारसायकल चोरी करुन विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आरोपींकडून एकूण २३ मोटारसायकल अंदाजे १५ लाख रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींकडून हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील अधिक चोरीच्या मोटारसायकल मिळण्याची शक्यता आहे. तसेच पाच वर्षांपासून फरारी आरोपी निहाल उर्फ बंगा बालाजी डोईजड (२१, रा. कोहिनूर कॉलनी, वसमत) हा मिळून आला आहे. कारवाईतील अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत त्यांचे कौतुक केले.
ही कारवाई स्था.गु.शा.चे. पोउपनि एस.एस. घेवारे, पोउपनि के. डी. पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोेळवे, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, किशोर कातकडे, आशिष उंबरकर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे यांनी केली आहे.