गावात तीन जलकुंभ असूनही पाण्यासाठी पायपीट; युवकांचे पाण्यासाठी जलकुंभावर आंदोलन
By रमेश वाबळे | Updated: February 27, 2025 16:44 IST2025-02-27T16:43:09+5:302025-02-27T16:44:08+5:30
गावात तीन जलकुंभ ; दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ...

गावात तीन जलकुंभ असूनही पाण्यासाठी पायपीट; युवकांचे पाण्यासाठी जलकुंभावर आंदोलन
हिंगोली : एक नव्हे, दोन नव्हे तर तीन पाणीपुरवठा योजना गावात राबवूनही पाणीटंचाई कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव (सोळंके) येथे युवकांनी चक्क जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या कोरड्या जलकुंभावर चढून २७ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले.
औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या येहळेगाव (सोळंके) येथे गावातील काही युवकांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरू केले आहे. गावात पाणी मिळत नसल्याने लोकांनी अगोदरच जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवली होती. परंतु, कुठली दखल घेतली गेली नसल्याने युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जलजीवन मिशन अगोदर गावात दोन योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेले आहेत. परंतु, एकही टाकी लोकांच्या तहान भागविण्यासाठी कामी पडत नाही. शिवाय गावातील ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत देखील फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नित्याचीच झाली आहे. ग्रामपंचायतीवर वर्चस्व कुणाचेही असो पण टंचाईचा हा प्रश्न मिटत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी येथे अशाच पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर युवकांना चक्क अमरण उपोषण करावे लागले होते. आता पुन्हा ग्रामस्थांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे आंदोलन करण्यात यावेळी काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुढे आहेत.
गावात तीन जलकुंभ ; दुसऱ्यांदा आंदोलनाची वेळ...
औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील पाणी प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी सुरू झालेल्या आंदोलनापूर्वी देखील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागील काही वर्षांपूर्वी युवकांना असेच आंदोलन करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घ्यावा लागला होता. आता पुन्हा युवकांना या प्रश्नासाठी पुढे यावे लागले आहे.
तहसीलदारांच्या मध्यस्थीने युवकाचे आंदोलन मागे...
येहळेगाव (सोळंके) येथे युवकांनी सुरू केलेले आंदोलन याची माहिती मिळतात औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांनी तातडीने गावात येऊन भेट दिली. यावेळी हिंगोली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते नरवाडे, अभियंता बोरकर यांची उपस्थिती होती. युवकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती शुभम सोळंके यांनी दिली.