वसमतमध्ये इंधन टंचाईची अफवा! पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपर्यंत रांगा; नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:24 IST2026-03-26T12:20:54+5:302026-03-26T12:24:03+5:30

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Fuel Shortage Rumors Spark Chaos in Vasmat; Petrol Pumps Go Dry as Residents Panic-Buy Over Global War Fears | वसमतमध्ये इंधन टंचाईची अफवा! पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपर्यंत रांगा; नागरिक हैराण

वसमतमध्ये इंधन टंचाईची अफवा! पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपर्यंत रांगा; नागरिक हैराण

वसमत (जि. हिंगोली): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा वसमत शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. या अफवेचा धसका घेत बुधवारी सायंकाळपासूनच नागरिकांनी शहरातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली होती. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत ही गर्दी कायम असल्याने गुरुवारी सकाळी शहरातील बहुतांश पेट्रोल पंप 'ड्राय' (रिकामे) झाले असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

बॉटल आणि कॅन घेऊन नागरिकांच्या रांगा
२५ मार्च रोजी सायंकाळी इंधन संपणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. त्यानंतर बघता बघता शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक नागरिक गाड्यांसोबतच बॉटल आणि मोठ्या कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल भरून साठवणूक करताना दिसले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ आणि त्यांच्या पथकाने पंपांवर धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

शहरातील पंप बंद, कुरुंद्यात मात्र गर्दी
अचानक वाढलेल्या मागणीमुळे शहरातील पेट्रोल पंपांवरील साठा बुधवारी रात्रीच संपला, त्यामुळे गुरुवारी सकाळी वसमत शहरातील पंप बंद ठेवावे लागले. मात्र, शहरापासून जवळच असलेल्या कुरुंदा येथील पंपावर गुरुवारी सकाळीही नागरिकांनी कॅन आणि बॉटल घेऊन मोठी गर्दी केली होती. इंधन मिळणार की नाही, या भीतीपोटी सर्वसामान्यांमध्ये मोठी धास्ती पसरली आहे.

प्रशासनाचे स्पष्टीकरण: अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
या संपूर्ण गोंधळावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. "या केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. पंप धारकांनी कोणत्याही परिस्थितीत कॅन किंवा बॉटलमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये, केवळ वाहनांमध्येच इंधन भरून देण्यात यावे," अशा कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Web Title : वसमत में ईंधन की कमी की अफवाह से दहशत, पंप हुए खाली

Web Summary : वसमत में ईंधन की कमी की अफवाह से दहशत फैल गई, जिससे पेट्रोल पंप खाली हो गए। नागरिकों में डर के बीच रात भर कतारें लगी रहीं। अधिकारियों ने कमी से इनकार किया, जमाखोरी के खिलाफ चेतावनी दी।

Web Title : Fuel Shortage Rumors Cause Panic Buying in Wasmat, Pumps Run Dry

Web Summary : Rumors of fuel shortages in Wasmat triggered panic buying, emptying petrol pumps. Citizens queued overnight amid fears. Officials deny scarcity, warning against hoarding and assuring action against rumor-mongers.