नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:45 IST2020-03-05T19:44:53+5:302020-03-05T19:45:23+5:30
दवाखान्यासाठी पैसे हवे आहेत, आमच्याजवळील सोन्याचे बिस्कीट कोणी विकत घेत नाही

नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल
वसमत (जि. हिंगोली) : येथील हाऊसिंग सोसायटी भागात राहणाऱ्या वृद्ध महिलेस सोन्याचे नकली बिस्कीट देऊन तिच्याजवळील सोन्याची अंगठी व सोन्याची पोत भामट्यांनी लांबवली.
वसमत येथील कमलबाई गंगाकिशनराव कर्णेवार (७८) या वृद्ध महिलेस मंगळवारी सायंकाळी दोन भामट्यांनी रस्त्यावर गाठले. सोन्याचे बिस्कीट सापडले आहेत, ते तुम्हाला घ्या व तुमच्या जवळचे दागिने किंवा पैसे द्या, अशी गळ घातली. दवाखान्यासाठी पैसे हवे आहेत, आमच्याजवळील सोन्याचे बिस्कीट कोणी विकत घेत नाही, अशी बतावणीही केली.
सदर भामट्यांच्या बोलण्यास कमलबाई भुलली व १२ ग्रॅमची सोन्याची पोत व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा ११ हजार रुपयांचा ऐवज घेऊन या भामट्यांनी पोबारा केला. या बिस्कीटची किंमत ६० ते ७० हजारांच्या घरात जाते, असे या भामट्यांनी कमलबार्इंना सांगितले होते. दिलेले सोन्याचे बिस्कीट नकली असल्याचे समजताच दोन अज्ञात भामट्यांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोहेकॉ. चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.