उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:06 IST2025-03-04T18:59:13+5:302025-03-04T19:06:25+5:30

पूर्णा शहरासाठी नदीपात्रात सोडला विसर्ग;सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले

Four gates of Siddheshwar Dam opened; Discharge released into the riverbed for Purna city | उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

- हबीब शेख
औंढा नागनाथ ( हिंगोली) :
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत पूर्णा शहराच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून त्याद्वारे पूर्णा शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिद्धेश्वर धरणातून २० नोव्हेंबर २०२४ पासून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी निरंतर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. आता १ मार्चपासून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन देण्यात येत आहे. त्यातच सिद्धेश्वर जलाशयावर अवलंबून असलेल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्णा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केल्याने ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे १ फूट उचलून २ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पूर्णा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा शहरालगतचा कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्र तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘सिद्धेश्वर’ मध्ये ३६ टक्के जिवंत साठा...
तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून हिंगोलीसह परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांतील ५७ हजार हेक्टर शेतीचे सिंचन केले जात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी हंगामाच्या तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या असून १ मार्चपासून उन्हाळी हंगामाच्या पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली. प्रत्येक अवर्तनाला कमीतकमी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. परंतु सिद्धेश्वर जलाशयात आजमितीस केवळ ३० दलघमी (३७ टक्के) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पूर्णा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे.

येलदरी धरणातून पाण्याची आवक...
लाभक्षेत्रातील शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. पुढील पाणीपाळीस अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाणीपातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येलदरी धरणाचे दोन विद्युत निर्मिती टर्बाइन चालू करण्यात आले असून त्याद्वारे सिद्धेश्वर जलाशयाचा पाणी साठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

Web Title: Four gates of Siddheshwar Dam opened; Discharge released into the riverbed for Purna city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.