कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली
By विजय पाटील | Updated: November 24, 2023 14:50 IST2023-11-24T14:49:12+5:302023-11-24T14:50:20+5:30
‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली
हिंगोली: मुंबईला जाऊन अवयव विक्री करण्याची तयारी सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या संदर्भात शुक्रवारी स्वत:ला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला. शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना होण्याचा निश्चय करण्यात आला.
यावर्षी गोरेगाव व परिसरात पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमीच राहिले. खरीप हंगामात पावसाअभावी पिके करपून गेली. अनेकांनी उसनवारी करुन खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा व इतर शासकीय अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु शासनाने अजिबात लक्षही दिले नाही. त्यामुळे तर अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आजमितीस शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. २२ नोव्हेंबर रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव निवेदनाद्वारे पाठविला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी अंगाच्याभोवती अवयव विक्रीचे दरपत्रक लावून, हाती शेती कर्जाचे पासबुक घेत गोरेगाव येथील अपर तहसीलसमोर घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणीप्रति शासन गांभीर्य घेत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांत आम्ही थेट मुंबईला जाऊन आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी अवयव विक्री करून मिळालेल्या पैशातून बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तयारी यावेळी शेतकऱ्यांकडून दर्शविण्यात आली.
शेतकऱ्यांनी वाहिली स्वत:लाच श्रद्धांजली...
२४ नोव्हेंबर रोजी स्वत:हाच्या प्रतिमांना पुष्पहार घालीत श्रद्धांजली अर्पण करुण आज सायंकाळी मुंबई येथे रवाना होत तीथे उद्या किडनी, लिव्हर डोळे आदी अवयव विक्री करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे प्रकाश मगर, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी आदी उपस्थिती होती.
उद्या होणार मुंबईत दाखल...
विविध अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणे शक्य नाही. त्यामुळे अवयव विक्रीचा निश्चय करण्यात आला उदया मुंबईत दाखल होऊन कर्ज परतफेडीसाठी शासनाला शरीरातील अवयव काढून देणार आहोत. तेंव्हा गावाकडे जीवंत परंत येवू की नाही. त्यामुळे तर गावामध्ये स्वतःला जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण करून मुंबई येथे जाण्याचा निश्चय करण्यात आला आहे.