शेतकऱ्याचा काळजाचा ठोका चुकला! रात्री शेतात पिकांना पाणी देताना समोर बिबट्या उभा होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:17 IST2025-12-20T13:07:41+5:302025-12-20T13:17:09+5:30
कळमनुरी तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! पोतऱ्यानंतर आता देववाडीतही दर्शन; शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल

शेतकऱ्याचा काळजाचा ठोका चुकला! रात्री शेतात पिकांना पाणी देताना समोर बिबट्या उभा होता
- गंगाधर शितळे
डोंगरकडा (कळमनुरी): कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता हा धोका अधिकच वाढला आहे. शुक्रवारी रात्री देववाडी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये आणि विशेषतः रात्री शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रबी हंगामातील पिकांना वाचवण्यासाठी रात्रभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता स्वतःचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गव्हाच्या शेतात 'काळा'शी सामना
देववाडी येथील शेतकरी गजानन टारफे हे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्याच वेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसून आला. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे पाहून टारफे यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या ओरडण्यामुळे आणि शेजारील शेतकऱ्यांच्या आवाजामुळे बिबट्या तिथून पसार झाला, मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
वन विभागाची कसरत सुरूच
पोतरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाने तिथे ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. आता देववाडीतही बिबट्या दिसल्याने वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेश पाठवून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बळीराजा संकटात
सध्या रबी हंगामातील गहू आणि इतर पिकांना पाणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी आखाड्यावरच मुक्कामी असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात जाणे धोक्याचे झाले आहे. "पिकं वाचवली तर पोट भरेल, पण जीवच राहिला नाही तर काय करणार?" असा आर्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.