शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित
By विजय पाटील | Updated: August 8, 2023 17:01 IST2023-08-08T17:00:22+5:302023-08-08T17:01:15+5:30
कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी.

शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित
- इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली) : शहरातील कृषी केंद्रांची जुलै महिन्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. या तपासणीत दोन कृषी केंद्र धारकांच्या दप्तरात त्रुटी आढळून आल्या. कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी अहवाल वरिष्ठस्तरावर पाठवला होता. यानंतर या दोन्ही दुकानांचे परवाने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.
वसमत शहरातील कृषी केंद्रांची जुलै महिन्यात तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे व पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी रामेश्वर गवळी यांनी तपासणी केली. तपासणीत महाराष्ट्र ॲग्रो एजन्सी व देवकृपा कृषी केंद्र यांच्या दप्तरात त्रुटी आढळून आल्या होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी सदरील कृषी केंद्राचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला होता.
यानंतर १ ऑगस्ट रोजी जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दोन्ही कृषी केंद्राचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याची सुनावणी केली. कृषी केंद्र धारक यांना मंगळवारी परवाने निलंबित केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वसमत शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रधारकांविषयी तक्रारी वाढत आहेत. सध्या युरियाची टंचाई करुन दुकानदार जादा दराने विक्री करत आहेत. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास कृषी विभागाकडे कराव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे तक्रारी कराव्यात...
कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी. तात्काळ तक्रारीची चौकशी करुन कारवाई केल्या जाईल. युरिया खताचा तुटवडा करुन दुकानदार खत विक्री करत असेल तर माहीती द्यावी.
- रामेश्वर गवळी, पं. स. कृषी अधिकारी, वसमत.