हिंगोली : शेतात हरभऱ्याचे पीक गोळा करत असताना अचानक आग्यामोहोळाने हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव शिवारात २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
जवळा (बु.) येथील शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे (वय ४५) यांचे शेत बाभूळगाव शिवारात आहे. २६ फेब्रुवारी रोजी ते मुलगा धनंजयसह शेतात काढून ठेवलेले हरभऱ्याचे पीक जमा करण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास हरभरा जमा करत असताना अचानक आग्यामोहळाच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रारंभी पाच-दहा मधमाश्या भास्कर खिल्लारे यांच्या दिशेने आल्या आणि चावा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी भास्कर खिल्लारे आणि धनंजय खिल्लारे यांनी बचावासाठी पळ काढला. परंतु, काही क्षणातच आग्यामोहळाच्या हजारों मधमाश्या त्यांच्या दिशेने आल्या. वडील भास्कर यांना मधमाश्यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी धनंजय यांने प्रयत्न केला. परंतु, त्याच्यावरही मधमाश्यांनी हल्ला केला. धनंजयने मदतीसाठी आरडाओरड करत गाव गाठले.
हजारो मध्यमाशांनी घेतला चावात्यानंतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. तोपर्यंत मात्र भास्कर खिल्लारे बेशुद्ध झाले होते आणि हजारो मधमाश्या त्यांना चावा घेत होत्या. ग्रामस्थांनी आजूबाजूला धूर केला. तर काहींनी कपड्याच्या साहाय्याने मधमाश्या बाजूला करून भास्कर खिल्लारे यांची सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी तपासून भास्कर खिल्लारे यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे जवळा (बु.) येथे शोककळा पसरली आहे. दरम्यान, आग्यामोहोळाच्या हल्ल्यात जखमी धनंजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.