आठ महिन्यांची 'चंद्रा' निघाली प्रयागराजला; विविध धार्मिक कार्यक्रमात नेहमी असतो सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 19:25 IST2025-02-15T19:24:33+5:302025-02-15T19:25:04+5:30
चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे.

आठ महिन्यांची 'चंद्रा' निघाली प्रयागराजला; विविध धार्मिक कार्यक्रमात नेहमी असतो सहभाग
इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू असून अनेक भाविक तेथे जात आहेत. हे पाहून 'चंद्राला' सोबत घेऊन जाण्याचा निर्णय तिच्या मालकाने घेतला आणि चंद्राही जाण्यासाठी तयार झाली. शनिवारी महाकुंभ मेळ्यासाठी शहरातील अनेक भाविक रवाना झाले असून त्यात म्यानेवार कुटुंबातील सदस्य असलेली चंद्राचा (कालवड) समावेश आहे. चंद्राचा नेहमीच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असतो. म्हणून म्यानेवार कुटुंबाने तिला सोबत नेण्याचा निर्णय घेतला.
वसमत नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांनी गत आठ महिन्यांपूर्वी चंद्राला (कालवड) गोशाळेतून घरी आणले.तिच्या आईचे निधन झाले होते तेंव्हा ती पंधरा दिवसांची होती. मान्येवार यांनी चंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे गोशाळेतून कालवड त्यांना देण्यात आली. चंद्रा आजमितीस आठ महिन्याची झाली आहे. म्यानेवार कुटुंब धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात जाताच चंद्रा पण त्यांच्या सोबत जाते व कार्यक्रमात सहभाग घेत असते. १५ फेब्रुवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष म्यानेवार यांच्या सोबत 'चंद्रा', गोविंद भुसे,गजानन बेंडे,राजू मोरेवार, संतोष बोड्डेवार,दशरथ मजनवार सुभाष फेदराम हे महाकुंभ मेळ्यासाठी रवाना झाले आहेत.
पशुसंवर्धन विभागाने दिली परवानगी...
चंद्राची (कालवड) महाकुंभला घेऊन जाण्यापूर्वी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय सावंत यांनी वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच चंद्राला नेण्यासाठी वाहतूक परवाना देखील काढण्यात आला आहे.