खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:37 IST2022-04-06T13:36:44+5:302022-04-06T13:37:20+5:30

दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, एका प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे

Exciting! Two brutally murdered at two places in Hingoli | खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या

खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या

गोरेगाव ( हिंगोली ): गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी आज सकाळी दोघांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बसथांबा चौक येथे एका ४५ वर्षीय परप्रांतीयाचा तर गुगुळ पिंपरी येथे ३१ वर्षीय युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, गोरेगाव बस थांबा चौक रस्त्यावर लादू लाल शाहू ( ४५ वर्ष रा. भीलवाडा, राजस्थान ) यांचे ज्युस सेंटर आहे. आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ज्यूस सेंटरमध्ये झोपलेल्या शाहू यांच्यावर तिघांनी हल्ला केला. सेंटरमध्ये काम करणाऱ्या एकाने शाहू यांच्या ओळखीतील व्यक्तीस याची माहिती दिली. पोलिसांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत गंभीर जखमी झालेल्या शाहू यांचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गुगुळ पिंपरी येथे देखील एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमोल परसराम इंगोले या मध्यरात्री घरी येऊन अंगणात झोपला होता. अचानक पहाटे काहीजणांनी त्याच्यावर हल्ला केला. लाठ्याकाठ्याने बेदम मारहाणीत अमोलचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी दोन्ही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गुगुळ पिंपरी येथील प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक वाखारे, पीएसआय बाबुराव जाधव, स्था. गु शा. चे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय , सपोनि शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली.  
 

Web Title: Exciting! Two brutally murdered at two places in Hingoli