औंढ्यात राज्य रस्त्यावर अतिक्रमण
By Admin | Updated: August 17, 2014 00:21 IST2014-08-17T00:21:20+5:302014-08-17T00:21:20+5:30
औंढा नागनाथ : येथे परभणी-हिंगोली जाणाऱ्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे.

औंढ्यात राज्य रस्त्यावर अतिक्रमण
औंढा नागनाथ : येथे परभणी-हिंगोली जाणाऱ्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. औंढा येथे पर्यटनस्थळ असल्याने नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
औंढा येथे हिंगोली- परभणी रस्त्यावर हुतात्मा स्मारकापासून ते नवीन बसस्थानकासमोर हॉटेल, पाणपट्टी, मिठाईवाल्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आपली दुकाने थाटली आहे. रस्ता सोडून ५ फुट अंतरावरच दुकाने असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी राहतात. पर्यटक निवासापुढे देशी दारूचे दुकान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यालगतच उघड्यावर मांसविक्री होत आहे. परिणामी दोन्ही बाजूने रस्ता अरूंद झाल्याने रस्त्याच्या कडेला खोदलेल्या नाल्या बुजल्या आहेत. त्यामुळे अल्पश: पावसानेही संपूर्ण पाणी रस्त्यावर येत असल्याने येथील रहिवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बांधकाम विभागाला याबाबत अनेकवेळा लेखी व तोंडी सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. परिणामी पर्यटकांना या अरूंद रस्त्यावरून मंदिराकडे जावे लागते. त्यामुळे या अरूंद रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)