वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन
By विजय पाटील | Updated: August 14, 2023 16:46 IST2023-08-14T16:46:14+5:302023-08-14T16:46:27+5:30
वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही.

वसमतमध्ये गाढव मोर्चाने वेधले लक्ष; घरकुल योजनेसाठी आक्रमक आंदोलन
- इस्माईल जाहगिरदार
वसमत (जि. हिंगोली): पंचायत समिती व नगरपालिका प्रशासनाने गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना घरकुल योजनेचा लाभ देत भ्रष्ट्राचार केला,गरजुंचे नावे घरकुल योजनेत समाविष्ट करणे आदी मागण्यांसाठी भीमशक्तीच्यावतीने सोमवारी गाढव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. भीमशक्ती व काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामुळे धनदांडग्यांना लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे. त्वरित रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करुन लाभार्थ्यांना घरकुल देणे, बोरी सावंत, भोगाव, करंजी, हट्टा, कळंबा,
बळेगाव येथील गरजुंचे रमाई आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करण्यात यावी, नगरपालिके अंतर्गत येणारे नसरतपुर, सीराज कॉलनी या भागातील गरजुंचे नावे रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना यात समाविष्ट करणे, बोरी सावंत येथे दलित वस्तीचा निधी इतरत्र खर्च केला याची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी भीमशक्तीच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.
गाढवांच्या पाठीवर लावले बोर्ड...
१४ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चात दोन गाढव होते. गाढवांच्या पाठीवर नगरपालिका व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे पद नाम लिखित फलक लावून शहरातील विविध मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयवर धडकला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना देण्यात आले. निवेदनावर काँग्रेसच्या प्रिती जयस्वाल, राजाराम खराटे, पुष्पक देशमुख, भीमशक्तीचे प्रमोद कुलदिपके, काशिनाथ गायकवाड, सागर दिपके, भीमा कांबळे, राहुल घोडके, गौतम खंदारे यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.