हिंगोली : जिल्ह्यात यंदाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातच ऐन काढणीत यंदा पुन्हा शेतकऱ्यांची गाळण उडाल्याने मोठे नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळत असून यात पहिल्या टप्प्यात ५० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आणखी तेवढाच निधी लागणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने सर्व भागांतील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदने दिली होती. त्यातच पालकमंत्री, खासदार, आमदारांनीही विविध भागांत दाैरे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. प्रशासनानेही या सर्व बाबींची दखल घेत तात्काळ पंचनामे केले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे समोर आले. त्यामुळे तसा अहवालही शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ घोषित झाला. शेतकऱ्यांना भरपाईही जाहीर झाली. नवीन निकषानुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या नियमानुसार मदत जाहीर झाली आहे.
यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दिवाळीपूर्वी ११४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. त्याचे वितरण करण्यासाठी तो लागलीच तहसील कार्यालयांना प्रदान करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याचे खातेक्रमांक, क्षेत्रफळ आदी बाबींनुसार तो विभागून खात्यावर टाकण्यासाठी जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला. आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. तर उर्वरित मदतीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तो आल्यावर वितरित केला जाईल.
उरलेली रक्कम कधीपर्यंत मिळणार
अतिवृष्टीतील अनुदान दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, दिवाळीनंतर खात्यावर अर्धी रक्कम जमा झाली आहे. आता उरलेली रक्कम कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.
- संजय गायकवाड
शेतकरी
शासनाकडे उर्वरित रक्कमेची मागणी
यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून प्राप्त अनुदानातून ५० टक्के रक्कम जमा झाली आहे. उरलेले अनुदान आल्यानंतर पुन्हा ५० टक्के रक्कम खात्यावर जमा होईल.
- रुचेश जयवंशी,
जिल्हाधिकारी