हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणानगरात ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आर.व्ही. त्रिमुखे यांच्या घरी शस्त्राचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाख रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला होता. या घटनेमुळे हिंगोली शहरातही भीतीचे वातावरण पसरले होते. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी हिंगाेली ग्रामीणचे स.पो.नि. बी.आर. बंदखडके, स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय यांचे पथक कामाला लावले होते. या पथकाने दोन दिवसांत दरोडा प्रकरणातील तब्बल ११ दरोडेखोरांना अटक करून घटनेची उकल केली. मात्र यातील मुख्य दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाला होता. यातील मुख्य आरोपी पाथरी येथे असल्याची तसेच एक महिला आरोपी तुळजापूर येथे असल्याची माहिती ग्रामीणचे स.पो.नि. बंदखडके यांना मिळाली होती. त्यानुसार पो.उप.नि कांबळे, रविकांत हारकळ, शंकर ठोंबरे, म.पो. खिल्लारे, वाठोरे, चव्हाण, बंडे यांचे पथक आरोपीच्या शोधात पाठविले होते. त्यानुसार १६ मार्च रोजी मुख्य दरोडेखोरास पाथरीत बेड्या ठोकत तुळजापूर येथून एका महिला आरोपीलाही ताब्यात घेतल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. मुख्य दरोडेखोराच्या अटकेसाठी परभणीच्या स्थागुशा पथकानेही मदत केली.
मुख्य दरोडेखोरासह महिला आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST