कापसाच्या पिकात गांजाची लागवड; भोगाव शिवारातील ४० झाडे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:48 IST2022-10-14T12:48:13+5:302022-10-14T12:48:50+5:30
भोगाव शिवारात आनंता गाडगेच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती.

कापसाच्या पिकात गांजाची लागवड; भोगाव शिवारातील ४० झाडे जप्त
वसमत (हिंगोली) : भोगाव शिवारात कापसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. आज सकाळी हट्टा पोलिसांनी येथे छापा टाकून ३५ ते ४० गांजाची झाडे जप्त केली आहेत. घटनास्थळ व परिसरातील पिकाची पाहणी पोलीस पथकाने करण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील भोगाव शिवारात आनंता गाडगेच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. यावरून आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, फौजदार सतिष तावडे, गणेश लेकुळे, एस गव्हारे, एच सोनटक्के, सुर्रसे यांच्यासह महसूल पथकाने शेतकरी आनंता गाडगेच्या शेतात छापा मारला. यावेळी कापसाच्या पिकात ३५ ते ४० गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त केली असून पुढील कारवाई सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.