लम्पी स्कीनचे संकट वाढले; पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:39 IST2020-09-18T19:38:08+5:302020-09-18T19:39:14+5:30
मागील एक महिन्यापासून तालुक्यातील गायवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

लम्पी स्कीनचे संकट वाढले; पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा
- इलियास शेख
कळमनुरी : तालुक्यातील १३ पशुवैद्यकीय दवाखाने व उपकेंद्र आहेत. या सर्व दवाखान्यात जनावरांच्या औषधांचा तुटवडा आहे. सध्या जनावरांना लम्पीची लागण झाली. लम्पीची लागण झालेल्या जनावरांसाठी औषधांचा पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. खाजगी वैद्यकीय स्टोरवरही औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
मागील एक महिन्यापासून तालुक्यातील गायवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दीडशेच्या जवळपास जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यापैकी ६१ जनावरांवर उपचार केल्याने, ही जनावरे या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही ८९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत साडेसहा हजार जनावरांना लम्पीची लस देण्यात आली आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ७ हजार लम्पीची लस उपलब्ध झाली होती. त्यापैकी साडेसहा हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत १३ हजार लस तालुक्याला उपलब्ध होणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. नंदकिशोर जाधव यांनी दिली.
पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रतिजैविके, तापाची औषधे, जंतुनाशक व अॅलर्जीची इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे लम्पीच्या जनावरांवर उपचार कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे. हा आजार माशा, डासांमार्फत होत आहे. लम्पीची लागण झालेल्या जनावरांना गोठ्यात अंतराने बांधाव जागेवरच चारा व पाणी द्यावे. गोठ्याचे निर्जंतुकीकरण फवारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्य आहेत.
जनावरांचे लसीकरण गरजेचे
कळमनुरी तालुक्यात गायवर्गीय जनावरे ४४ हजार २११ एवढी आहेत. हा आजार गायवर्गीय जनावरांमध्ये विषाणूंमुळे होतो. त्यामुळे तालुक्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. लम्पी आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी, गावोगावी पत्रके काढून जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील डोंगरकडा, मसोड, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, पोत्रा, वाकोडी, मोरगव्हाण, येळेगाव तुकाराम, रामेश्वर तांडा, कोंढुर, साळवा, बोथी, नांदापूर ही तेरा पशुवैद्यकीय दवाखाने व उपकेंद्र्र आहेत. पशुपालकांनी आपल्या जनावरांना लक्षणे दिसताच लस देण्यासाठीचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वेळेत उपचार केल्यास हा आजार बरा होत असल्याचेही सांगण्यात आले. कळमनुरी तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ४ पदे रिक्त आहेत. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे मोरगव्हाण, मसोड, वाकोडी येथील पदभार आहे.