वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:16 IST2021-03-26T17:13:20+5:302021-03-26T17:16:06+5:30
घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जाणाऱ्या पती-पत्नीस ट्रकने उडवले; पती जागीच ठार
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : वाशिम ते कनेरगाव राज्य रस्त्यावर असलेल्या सायखेडापाटीजवळ २६ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वाशिमकडून कनेरगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या तपोवन येथील विनोद विश्वनाथ मते (वय ४८, रा. तपोवन, ता. सेनगाव) हे सकाळी तपोवनवरून तोंडगावमार्गे मुख्य राज्य रस्त्यावरून उकळीपेनकडे जात होते. सायखेडा पाटीजवळ मागून येणाऱ्या (ट्रक क्रमांक एमएच. १८, बीजी ११५५) या क्रमांकाने दुचाकी (एमएच ३८-एल २०६८) दुचाकीला धडक दिली. यामध्ये विनोद मते हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
प्रवास्यांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाशिम ग्रामीणचे ठाणेदार रमेश पाटील, सपोनि नरडे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी आले. जखमी महिलेला वाशीम येथील रुग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. घटनेतील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. विनोद मते हे उकळीपेन येथे एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जात होते, अशी माहिती वाशिम पोलिसांनी दिली.