corona virus : '...तर टेरेसवरून उडी टाकून जीव देतो'; कोरोनावर उपचार न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:37 IST2021-04-28T14:28:05+5:302021-04-28T14:37:58+5:30
हिंगोलीतील जिल्हा कोविड रुग्णालयात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत इंगोले नामक एक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा झाल्याने दाखल आहे.

corona virus : '...तर टेरेसवरून उडी टाकून जीव देतो'; कोरोनावर उपचार न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला उपचार मिळत नसल्याने आता मला उपचार मिळाले नाही, तर टेरेसवरून उडी मारून जीव देतो, असा इशारा देणारी क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी डॉक्टरांना पाठवले असून आता तो कर्मचारी व्यवस्थित असल्याचे सांगितले.
हिंगोलीतील जिल्हा कोविड रुग्णालयात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत इंगोले नामक एक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा झाल्याने दाखल आहे. या कर्मचाऱ्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे व्हायरल क्लिपवरून जाणवत आहे. या कर्मचाऱ्याने म्हटले की, तात्काळ मदत मागता मागता मला जीव देण्याची वेळ येत आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना ही अवस्था आहे. मी येथे दाखल असून मला अस्थमाचा त्रास असताना दुसराच उपचार केला जात आहे. शिवाय माझी आई एकीकडे तर वडील माझ्यासोबत ॲडमिट आहेत. माझ्याकडे पैसेही नाहीत. मला मदत करायची तर सोडा साधे बघायलाही कुणी येत नाही. मी माझ्या वरिष्ठांशीही संपर्क साधला तरीही प्रतिसाद मिळत नाही. बघायला येणार... येणार... असे सांगितले जात आहे. मात्र, येत कोणी नाही. त्यामुळे मी टेरेसवरून उडी टाकून माझा जीव देत आहे, असा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर यंत्रणा जागी झाली. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टरही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या कर्मचाऱ्याला जाऊन आमचे अधिकारी भेटले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी डॉक्टरही पाठिवण्यात आला. त्यांच्या आम्ही आता सतत संपर्कात आहोत. त्यांच्या अडचणी सोडविल्या असून आणखी काही अडचण आल्यास ती सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक