वसमत येथे रस्त्यावर धावती कार पेटली; मात्र तक्रार द्यायलाही कोणी येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:58 IST2018-03-31T19:58:52+5:302018-03-31T19:58:52+5:30
वसमत-परभणी रस्त्यावरील खांडेगाव शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास धावती कार पेटली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोवर कार जळून खाक झाली होती.

वसमत येथे रस्त्यावर धावती कार पेटली; मात्र तक्रार द्यायलाही कोणी येईना
वसमत (हिंगोली ) : वसमत-परभणी रस्त्यावरील खांडेगाव शिवारात दुपारी साडेबाराच्या सुमारास धावती कार पेटली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवली. मात्र तोवर कार जळून खाक झाली होती. या कार जळीत प्रकरणाची तक्रार द्यायला किंवा कारची मालकी सांगायलाही कोणी पोलीस ठाण्यात आले नाही हे विशेष.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढलेला असताना परभणी रोडवर खांडेगाव शिवारात एक धावती कार पेटलेली काही वाहनचालक व ग्रामस्थांना दिसली. आगीचा भडका उडाल्याने कारमध्ये कोणी असेल अशी समजूत सर्वांची झाली. नागरिकांनी ताबडतोब बीट जमादार निवृत्ती बडे यांना मोबाईलवर माहिती दिली. जमादार निवृत्ती बडे, मारोती भुरके अग्निशाक दलासह घटनास्थळी दाखल झाले. आग विझवली असता कारमध्ये कोणी आढळले नाही. चालक घाबरलेल्या अवस्थेत आग लागताच बाहेर आला व खासगी दवाखान्यात रवाना झाल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. आगीत कार जळून खाक झाली. मात्र सदर कारच्या जळीत प्रकरणाची नोंद किंवा तक्रार द्यायलाही सायंकाळपर्यंत कोणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आले नव्हते. त्यामुळे कारचा मालक कोण व आग कशी लागली हे कोडे कायमच आहे. कारचा नंबर ही जळाल्याने कारबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.