औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2023 12:20 IST2023-07-24T12:20:24+5:302023-07-24T12:20:39+5:30

पिंपळदरी येथे रविवारी रात्री एक ते तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गावात प्रवेश केला.

Burglary at three places in one night in Pimpaldari in Aundha Nagnath taluka | औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

औंढा नागनाथ: तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. तिन्ही ठिकाणच्या चोरीत एकूण १२ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे.

तालुक्यातील पिंपळदरी येथे रविवारी रात्री एक ते तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गावात प्रवेश केला. जिल्हापरिषद शिक्षक श्रीकांत काष्टे यांच्या घरात लोखंडी गेट व दरवाजा तोडून प्रवेश केला. घरातील कपाट तोडून 8 तोळे सोने, 20 तोळे चांदी, 1 लाख 21 हजाराची रोकड लुटली. तसेच शे गफार यांच्या घरातून 2 तोळे सोन, 50 तोळे चांदी, 12 हजार रुपये रोकडसह दुचाकी चोरट्यांनी पळवली. त्यानंतर कोतवाल फलटणकर यांचे घर चोरट्यांनी फोडले. मात्र, येथे त्यांच्या हाती काही लागले नाही. 

दरम्यान, चोरीची माहिती सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी घोंगडे यांनी पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली. औंढा नागनाथ- पिंपळदरी रस्त्यावरील वाळकी फाट्यापासून काही अंतरावर पोलिसांचे वाहन पाहून चोरट्यांनी मोटरसायकल तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत शेतातून पलायन केले. पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार सांगळे यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Web Title: Burglary at three places in one night in Pimpaldari in Aundha Nagnath taluka