वसमत शहरात ३५ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:31 IST2025-05-20T11:31:16+5:302025-05-20T11:31:43+5:30
वसमत शहरातील रेल्वे दादरापुलाजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास आढळून आला मृतदेह

वसमत शहरात ३५ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
वसमत (जि. हिंगोली) : वसमत शहरातील परभणी-वसमत मार्गावर एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली. हत्या कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (१९ मे) रात्री घडली.
शहरातील रेल्वे दादरापुलाजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास चांदू सुग्रीव जाधव (वय ३५, रा. हयातनगर) हे गंभीर अवस्थेत जखमी स्थितीत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, मयताचा भाऊ राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मध्यरात्री तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, केशव गारोळे व इम्रान कादरी करत आहेत.