भुसार दुकान फोडून सोयाबीनचे ११० कट्टे केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2023 19:04 IST2023-03-21T19:04:10+5:302023-03-21T19:04:21+5:30

तीन लाख पाच हजार ५०० रुपयांचा माल चोरला

broke the shop and looted 110 sacks of soybeans | भुसार दुकान फोडून सोयाबीनचे ११० कट्टे केले लंपास

भुसार दुकान फोडून सोयाबीनचे ११० कट्टे केले लंपास

- रमेश कदम
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) :
येथील बोल्डा रोड भागातील व्यंकटेश्वरा ट्रेडिंग कंपनी हे भुसार दुकान फोडून चोरट्यांनी ११० सोयाबीनचे कट्टे, रोकड असा तीन लाख पाच हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. श्वान पथकाला पाचारण केले. परंतु, हाती काहीच लागले नाही.

आखाडा बाळापूर येथील बोल्डा रोड भागात गजानन अमिलकंठवार यांच्या मालकीचे भुसार दुकान आहे. व्यंकटेश्वरा ट्रेडिंग कंपनी या नावाने हे दुकान चालते. या ठिकाणी शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते. खरेदी केलेला माल गोदामामध्ये भरून ठेवण्यात येतो. दुकान मालक अमिलकंठवार हे सोमवार २० मार्च रोजी रात्री दुकान बंद करून नांदेड येथे गेले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील सोयाबीनचे कट्टे चोरून नेले. दुकानामध्ये नासधूसही केली. २१ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यांनी ही माहिती आखाडा बाळापूरचे पोलिस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांना दिली. त्यानुसार ठाणेदार बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, श्रीधर वाघमारे, बीट जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. चोरीची घटना घडलेले लक्षात आल्याने तातडीने त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवीन महामार्गाच्या पुलापर्यंतच माग काढला. आता सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. याप्रकरणी गजानन रेणुकादास अमिलकंठवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: broke the shop and looted 110 sacks of soybeans