'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला
By विजय पाटील | Updated: May 30, 2023 14:13 IST2023-05-30T14:13:39+5:302023-05-30T14:13:54+5:30
अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गच्चीला पकडून शिवीगाळ करत बाजूला ढकलून दिले.

'न्यायाधीशांना समोर आणा'; जामीन नाकारल्याने आरोपीचा राडा, न्यायालयाचा दरवाजा तोडला
हिंगोली : येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी राजपूत यांच्या कक्षाच्या दरवाजावर लाथा मारून आरोपीने काचा फोडल्या. तसेच पोलिसालाही गचांड्या दिल्याने हिंगोली शहर पोलिसांत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा एकावर दाखल झाला.
२९ मे रोजी डिग्रस कऱ्हाळे येथील संतोष विठ्ठल शेळके (हल्ली मुक्काम मस्तानशहानगर) याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी राजपूत यांच्यासमोर हजर केले होते. शेळके हा जिल्ह्यातून हद्दपार केलेला असताना येथेच वास्तव्यास आढळला होता. त्यामुळे कळमनुरी पोलिस ठाण्यातील हवालदार बाबूराव अंभोरे हे सुनावणीस घेवून आले होते. तेव्हा शेळकेने न्यायालयाच्या दरवाजावर लाथा मारून सरकारी मालमत्तेचे २ हजार रुपयांचे नुकसान केले.
त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता अंभोरे यांनाच तुमच्यासारखे लय पोलिस पाहिले आहेत, जो जज मला जमानत देत नाही, त्या जजला माझ्यासमोर आणा म्हणून जोरजोरात आरडाओरड करू लागला. पोलिस कर्मचारी अंभोरे हे समाजवत असताना त्यांनाही गच्चीला पकडून शिवीगाळ केली. तसेच बाजूला ढकलून दिले. यात त्यांच्या गणवेशाच्या शर्टचे बटन तुटले. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.