आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात व्यूहरचना; दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या हाती शिवबंधन
By विजय पाटील | Updated: August 29, 2022 17:10 IST2022-08-29T17:10:36+5:302022-08-29T17:10:58+5:30
आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात ठाकरेंची खेळी; विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकांवरील नेत्यांच्या हाथी शिवबंधन

आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात व्यूहरचना; दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या हाती शिवबंधन
हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होण्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी माजी आमदार संतोष टारफे, अजित मगर या दोघांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने बळकटी मिळाली असली, तरीही आगामी काळात त्या दोघांचे नेमके काय गणित राहणार? हा प्रश्नच आहे.
कळमनुरी विधानसभेतील तीन तगडे प्रतिस्पर्धी म्हणून आमदार संतोष बांगर, अजित मगर व माजी आमदार संतोष टारफे यांच्याकडे पाहिले जाते. त्यात आता विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांचीही भर पडली आहे. मात्र, मागील निवडणुकीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मगर व टारफे यांनी एकाचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दोघांचाही आगामी विधानसभा निवडणुकीवर डाेळा आहे. यात मगर यांनी तर माझी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणी झाल्यावरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आज त्यांचाही प्रवेश झाला आहे. अजून त्यांच्या बोलणीचा तपशील बाहेर आलेला नाही. माजी आमदार संतोष टारफे यांनी मात्र कोणत्याही अटी व शर्ती ठेवल्या नव्हत्या. पक्षाचे काम करून पुढे जे मिळेल ते घेऊ, असे त्यांचे म्हणणे होते.