'लिगो'चे काम प्रगतीपथावर; प्रयोगशाळेसाठी कंपन, आवाज नसलेल्या जागेच्या शोधात अभियंते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:29 IST2025-12-12T13:29:06+5:302025-12-12T13:29:50+5:30
जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली प्रयोगशाळा औंढ्यात

'लिगो'चे काम प्रगतीपथावर; प्रयोगशाळेसाठी कंपन, आवाज नसलेल्या जागेच्या शोधात अभियंते
- रमेश वाहुळे
औंढा नागनाथ : गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी तालुक्यातील दुधाळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या लिगोच्या प्रयोगशाळेचे काम प्रगतीपथावर आहे. भूसंपादन केलेल्या जागेवर सध्या या भागात कंपने नसलेली आणि आवाज नसलेल्या जागेची पाहणी अभियंते करीत आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष रस्ते आणि प्रयोगशाळा उभारणीची कामे होणार आहेत.
औंढा तालुक्यातील अंजनवाडा, दुधाळा परिसरात नासाची (नॅशनल एरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) प्रयोगशाळा लिगो प्रकल्प उभारला जात आहे. जगातील नासाची ही तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली प्रयोगशाळा भारतात औंढा तालुक्यात उभारली जात असल्याने औंढ्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. अंदाजे २,६०० कोटी रुपयांच्या खर्चातून ही प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू झाले आहे. दुधाळा परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता या भागात काही बांधकामे झाली आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपादित जागेत कंपने नसलेली आणि आवाज नसणाऱ्या जागेचा शोध घेतला जात आहे. अशा जागांवरून रस्ते आणि इतर कामे केली जात असल्याची माहिती येथील अभियंत्यांनी दिली.
तालुक्यात लिगो प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. हा प्रकल्प भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो शास्त्रज्ञ या भागात वास्तव्याला येतील. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. संबंधित जमीन मालकांना मोबदलाही मिळाला असून, प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.
गुरुत्वीय लहरींचा होणार अभ्यास
या प्रयोगशाळेत वातावरणातील गुरुत्वीय लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी प्रयोगशाळा येथे उभारली जात आहे. जागतिक स्तरावर गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात येथील प्रयोगशाळांचा मोठा वाटा राहणार आहे.
२०३० पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण
लिगो प्रयोगशाळा प्रकल्पाला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. साधारणत: २०३०पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. अणुउर्जा विभागामार्फत या प्रयोगशाळेचे बांधकाम केले जात आहे. त्यानंतर आयुका, पुणे संशोधन संस्थेला ही कार्यशाळा संशोधनासाठी हस्तांतरित केली जाणार आहे.
२,६०० कोटींचा प्रकल्प
लिगोची प्रयोगशाळा उभारण्यासाठी साधारणत: २,६०० कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. त्यापैकी काही रक्कम प्रयोगशाळा उभारणीसाठी मंजूर झाली आहे. कामे सुरू झाली आहेत. लवकरच प्रयोगशाळेच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया होणार आहे.