जांभळे जमा करताना कुऱ्हाडीचे घाव घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:55 IST2025-08-09T14:45:44+5:302025-08-09T14:55:01+5:30
९ जुलै २०११ रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा

जांभळे जमा करताना कुऱ्हाडीचे घाव घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; पाच जणांना कारावास
हिंगोली : कुऱ्हाडीच्या धारदार पात्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाच जणांना पाच वर्षे कारावास आणि प्रत्येकी ५५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील राहुली खु. येथील रंगराव किशन लोणकर यांनी ९ जुलै २०११ रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार रंगराव यांचे वडील किशन रामजी लोणकर हे आखाड्यावर जांभळे जमा करीत असताना आरोपींनी त्यांना कुऱ्हाडीच्या धारदार पात्याने डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून आरोपी उत्तम चंद्रभान नरवाडे, चंद्रमुनी उत्तम नरवाडे, हरिभाऊ चंद्रभान नरवाडे, अरविंद उत्तम नरवाडे आणि आशालता उत्तम नरवाडे यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपासी अंमलदार धोंडीबा कोल्हे आणि विजय रोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालविण्यात आले.
सरकार पक्षाच्या वतीने ॲड. एन. एस. मुटकुळे व ॲड. सविता एस. देशमुख यांनी १३ साक्षीदार तपासले. त्यापैकी वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, जखमी व इतरांची साक्ष ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी कलम ३०७ भादंवि. सह कलम १४९ अंतर्गत पाचही आरोपींना ५ वर्षे साधा कारावास व प्रत्येकी ५५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १५ हजार रुपये फिर्यादीचे वडील किशन लोणकर यांना देण्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात ॲड. एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सविता एस. देशमुख यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे आणि कोर्ट पैरवी पी. व्ही. धुर्वे यांनी सहकार्य केले.