अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती
By रमेश वाबळे | Updated: December 17, 2022 17:03 IST2022-12-17T17:02:51+5:302022-12-17T17:03:46+5:30
अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती
हिंगोली : येथील जलेश्वर तलाव परिसरातील उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या न.प. व पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकावर संतप्त अतिक्रमणधारकांनी अचानक हल्ला चढविला. यात एक कर्मचारी जखमी असून ऑटो व पोलिस जीपचे नुकसान झाले.
१६ डिसेंबर रोजी जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ अधिकारी व मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारकांच्या आक्रमकतेला नियंत्रणात ठेवता आले होते. १८ डिसेंबरला काही ग्रामपंचायतींचे मतदान असल्याने प्रशासन त्याच्या नियोजनात आज व्यस्त होते. त्यामुळे मोहिमेला अर्धविराम देत सोमवारी ती राबविण्याचे ठरले होते. तरीही सूचना देण्यासाठी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे पथक गेले असता अचानक दगडफेक झाली. यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. ऑटोवरही दगडफेक केली. तो उलटवून टाकला. त्यावरील भोंगा फोडला.
यात न.प.चे कर्मचारी पंडित मस्के यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांना मनुष्यबळ जमविण्यासाठी जुळवाजुवळ करावी लागली. पोलिस कर्मचारी इतर बंदोबस्ताला असल्याने घटनास्थळी एक तासापेक्षा जास्त काळ गोंधळाचे वातावरण होते. काल अतिक्रमण हटावच्या पहिल्या दिवशी जमाव आक्रमक होण्याची भीती असल्याने प्रशासनाने सर्व तयारी केली होती. मात्र, तेव्हा काहीच झाले नाही. आज अतिक्रमण काढले जात नसतानाही हा प्रकार घडल्याने प्रशासनही चक्रावून गेले होते. तर अतिक्रमणधारकांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसत आहे.
घटनेनंतरही दगडफेक
ही घटना घडल्यानंतर अंबिका टॉकीज परिसरातही अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. तर या बाजूने व तलावाच्या दुसऱ्या बाजूने रस्ता बंद केला. दगडफेक सुरू केली. वाहने व पादचाऱ्यांना अटकाव केला. हे करणाऱ्यांत महिलाच जास्त असल्याने इतर पोलिसांना काहीच करता येत नव्हते. महिला पोलिस बळ आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पंडित कच्छवे यांच्यासह मोठा फौजफाटा येथे दाखल झाला.
तणावाची स्थिती लागलीच नियंत्रणात
अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधीक्षकांनी परिसर पाहणी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र, या ठिकाणी बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. दगडफेकीनंतर सैरावैरा धावणाऱ्या गर्दीमुळेही वातावरण तंग होते. मात्र, पोलिसांची कुमक येताच स्थिती लागलीच नियंत्रणात आली.