एटीएसची कारवाई; तलवारीसह दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 14:25 IST2020-09-25T14:24:40+5:302020-09-25T14:25:26+5:30
नांदेड नाक्याजवळ दि. २४ सप्टेंबर रोजी गोंधळ घालणाऱ्या ५ व्यक्तींपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाठलाग करून अटक केली. संबंधितांकडून तलवार, स्क्रू ड्रायव्हर यासह बँकेचे पासबूक व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

एटीएसची कारवाई; तलवारीसह दोन आरोपींना अटक
हिंगोली : नांदेड नाक्याजवळ दि. २४ सप्टेंबर रोजी गोंधळ घालणाऱ्या ५ व्यक्तींपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाठलाग करून अटक केली. संबंधितांकडून तलवार, स्क्रू ड्रायव्हर यासह बँकेचे पासबूक व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दि. २४ सप्टेंबर रोजी नांदेड नाक्यावर काही व्यक्ती गोंधळ घालत होत्या. एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचताच संबंधितांनी पळ काढला. यावेळी सपोनि ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे रूपेश धाबे, महेश बंडे, वाहतूक शाखेचे पो.ह. कापसे, शिवाजी पारसकर, वसंत चव्हाण, फुलाजी सावळे आदींनी पाठलाग करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक तलवार, काही बँकांचे पासबूक, धनादेश, कागदपत्रे, स्क्रू ड्रायव्हर, मोबाईल असा एकूण ३७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात एटीएसचे पोलीस शिपाई रुपेश धाबे यांनी हिंगोली शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की नोकरीच्या शोधात असलेल्या युवक, युवतींना वनविभागात नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून भगतसिंग जमालसिंग खोलवाल हा शासकीय विभागांची बनावट कागदपत्रे तयार करतो. त्यासाठी नोकरीस इच्छूकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवितो व वेळप्रसंगी वाद झाल्यास लोकांना मारण्याकरिता सोबत तलवार बाळगतो.
त्यावरून हिंगोली शहर पोलिसांत खोलवाल याच्यासह गोपाल गाढवे, भागवत कोल्हे, सुदाम डिघोळे आणि ज्ञानेश्वर गाढवे अशा पाच आरोपींविरूद्धv कलम १४३, १४४, १४८, १४९, सहकलम ४/२५ भाहका अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.